Water Storage : बारा तालुक्यांमध्ये पाणीपातळीत ०.५२ ते ४.९८ फूट खालावली
Published on: 21 Feb 2024, 9:45 am
Pune News : पावसाळ्यात अपुरा पाऊस, परतीच्या पावसाने फिरवलेली पाठ आणि पाण्याचा वाढता उपसा यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी अडीच फुटांनी घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील १३ पैकी १२ तालुक्यांमधील पाणीपातळीत ०.५२ ते ४.९८ फूट इतकी घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.
यंदा पुरंदर तालुक्यात सर्वाधिक ४.२९ फुटांनी पाणीपातळी खोल गेली आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या जातात. या नोंदीतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील भूजल पातळीत झालेली वाढ, तसेच घट समजते. भूजल पातळीचा अभ्यास करण्याकरिता प्रत्येक पाणलोट क्षेत्रात तीन निरीक्षण विहिरी याप्रमाणे जिल्ह्यात १९२ निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. यात ७१ कूपनलिकांचा समावेश आहे.
यातील पाण्याचा उपसा केला जात नाही. पाणलोट क्षेत्रांनुसार भूजल नोंदणीची ठिकाणे ठरविली जातात. भूजल विभागाने जानेवारी महिन्यात घेतलेल्या नोंदीचा अभ्यास करून त्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील भूजल पातळीत घट झाल्याचे दिसून आले आहे.
पाच वर्षापूर्वी जानेवारीत भूजल पातळी ११.७७ फूट खाली गेली होती. यंदा मात्र पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात २.५५ फुटांनी पाणीपातळी खोल गेली आहे. तर आंबेगाव तालुक्यात पाणीपातळीत वाढ झाली आहे.
भूजल पुनर्भरण आवश्यकपाणीटंचाईवर मात करण्यासाठी भूजल पुनर्भरण गरजेचे आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात झालेल्या पर्जन्यमानानुसार भूजल पातळीत वाढ होते. पावसाळ्यानंतर भूजलाच्या वापरानुसार हा भूजल संचय कमी होतो व परिणामी पाण्याच्या पातळीत घट होत असल्याचे भूजल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
तालुकानिहाय पाणीपातळीतील वाढ अथवा घट (प्रमाण-फूट)आंबेगाव - ०.७२, बारामती - उणे ४.९८, भोर - उणे ३.४७, दौंड - उणे ३.५७, हवेली- उणे ०.८५, इंदापूर - उणे ३.४७, जुन्नर उणे १.५०, खेड - उणे ०.५२, मावळ उणे १.०१, मुळशी - उणे ३.०५, पुरंदर उणे ४.२९, शिरूर - उणे ३.२८, वेल्हा उणे ४.१३ (सर्व आकडे : जानेवारी २०२४ अखेर).
Original Article Can be Found at : https://agrowon.esakal.com/agro-special/the-ground-water-level-in-pune-district-decreased-by-two-and-a-half-feet-on-an-average
Comments